हरिश्चंद्रगड किल्ला

हरिश्चंद्रगड किल्ला

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.
‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा